बंद

    इतिहास

    सिंधुदुर्ग जिल्हा हा कोंकण प्रदेशाचा दक्षिणेकडील भाग असून, तो अरबी समुद्र आणि सहयाद्री पर्वतरांगाच्या मध्ये वसलेला आहे. दिनांक १ मे १९८१ रोजी मुळ रत्नागिरी जिल्हयापासून कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, कणकवली व देवगड हे ६ तालुके वेगळे करुन स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्हा स्थापन करणेत आला. नंतरचे दोन तालुके म्हणजे वैभववाडी आणि दोडामार्ग हे सिंधुदुर्ग जिल्हयाला जोडले गेले. त्याप्रमाणे सध्या सिंधुदुर्ग जिल्हयात एकुण ८ तालुके आहेत. या जिल्हयाची उत्तर – दक्षिण सरासरी लांबी सुमारे १३० किलोमिटर असून, पूर्व – पश्चिम रुंदी ४० कि.मी. आहे.

    सिंधुदुर्ग जिल्हयाच्या पूर्वेला कोल्हापूर जिल्हा आहे. उत्तरेला रत्नागिरी जिल्हा आहे, दक्षिणेला गोवा राज्य असून, पश्चिमेला अरबी समुद्र आहे. सिंधुदुर्ग जिल्हयाला १२७ कि.मी. एवढया लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. पूर्वेला सहयाद्री पर्वताच्या रांगा आहेत. या पर्वत रांगेत करुळ, फोंडा, आंबोली व भुईबावडा असे ४ मोठे घाट आहेत.

    जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्गची स्थापना दिनांक २७ जानेवारी १९९७ रोजी झाली. ओरोस हे कुडाळ तालुक्यातील मध्यवर्ती गाव असून ते जिल्हा मुख्यालय म्हणून निवडलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयाची स्थापना १९८१ साली झाली असली तरी या जिल्हयासाठी स्वतंत्र जिल्हा व सत्र न्यायालय वरील दिनांकापासून सुरु झाले. मुख्यालयाच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा न्यायालय व इतर न्यायालयांसाठी स्वतंत्र सुंदर इमारत बांधणेत आलेली आहे. सदर इमारतीमध्ये ९ स्वतंत्र न्यायालयांसाठी तरतुद करणेत आलेली आहे.

    दिनांक २५ जानेवारी १९९७ रोजी नविन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा माननिय न्यायमुर्ती श्री.एम.बी.शहा, तत्कालीन मुख्य न्यायमुर्ती ना. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या शुभहस्ते व माननिय तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी श्री. व्ही.जी. मुन्शी, यांच्या उपस्थितीत तसेच सिंधुदुर्ग जिल्हयाचे पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. एम.एन.गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

    तालुका न्यायालयांसह न्यायालयांची संख्या :-

    जिल्हा न्यायालय संकुलाचे ठिकाणी एकुण ५ न्यायालये कार्यरत आहेत. ती म्हणजे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग, जिल्हा न्यायाधीश-१ तथा अति. सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग, जिल्हा न्यायाधीश-२ तथा अति. सहा. सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा मुख्य न्यायदंडाधिकारी, सिंधुदुर्ग तसेच सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांची न्यायालये आहेत. तसेच ७ तालुका न्यायालये कार्यरत आहेत, ती म्हणजे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी वर्ग-१, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, कणकवली, देवगड व दाेडामार्ग ही आहेत. तसेच वैभववाडी येथे ग्रामन्यायालयाची स्थापना करणेत आलेली असून या न्यायालयाचा पदभार दिवाणी न्यायाधीश क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१ कणकवली यांचेकडे ठेवणेत आलेला आहे. याशिवाय या जिल्हयात कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, कणकवली येथे सह दिवाणी न्यायालये कार्यरत आहेत.